टीम AM : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली आहे. ते बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने एक निर्णय घेतला की, आम्ही 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.



