टीम AM : अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात सोमवारी पहाटे एका शाळेच्या सेवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विवेक करपे असे मृत सेवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पहाटे नागरिकांना तथागत चौकात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसल्यानंतर याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या शर्टाच्या खिशात एका खाजगी बसच्या प्रवासाचे तिकीट आढळून आले आहे. प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेचा सर्व अंगांनी तपास सुरू असून, तथागत चौक व परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरील हालचालींचा बारकाईने अभ्यास करून मृत्यूमागील सत्य शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात भर चौकात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



