अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे ‘कामबंद’ आंदोलन स्थगित : नगराध्यक्ष मुंदडांनी केली मध्यस्थी, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई शहरात ढगाळ वातावरणामुळे वातावरण जरी थंड असलं‌ तरी नगरपरिषदेचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अंबाजोगाई नगरपरिषदेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी गेल्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आजपासून बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले होते. थकीत वेतनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत ‌नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी कामगारांशी ‌दूरध्वनीवर संवाद साधत लवकरात लवकर वेतन अदा करतो, असे कामगारांना ‌आश्वासित केले, त्यामुळे कंत्राटी स्वच्छता ‌कामगारांनी‌ ‘कामबंद’ ‌आंदोलन‌ स्थगित केले‌ आहे.

दुसरीकडे ‌लोकविकास महाआघाडीच्या काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत आम्ही मागवलेली‌ माहिती का दिली नाही ? ‌याचा जाब विचारला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ‌ नगरपरिषदेच्या राजकारणाचा चांगलाच पारा चढताना ‌दिसत आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. वेतन थकल्यामुळे ‌त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गंभीर ‌प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. त्यामुळे कामगारांनी आजपासून ‘कामबंद’ आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनामुळे अंबाजोगाई शहरातील स्वच्छता, कचरा संकलन व इतर नागरी सेवांवर परिणाम होण्याची दाट शक्यता होती. या आंदोलनाची दखल घेत जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते ‌संजय गंभीरे आणि अनंत वेडे यांनी ‌नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि कामगारांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. ‌यावेळी मुंदडा ‌यांनी कामगारांच्या समस्या ‌ऐकून घेत त्या सोडविण्याचा ‌शब्द दिला. त्यामुळे कामगारांनी ‌’कामबंद’ आंदोलन स्थगित केले.

स्वच्छता कामगारांनी माजी नगराध्यक्ष ‌मोदी‌ यांची घेतली होती भेट

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगारांनी ‘कामबंद’ आंदोलन सुरु केल्यानंतर ‌माजी नगराध्यक्ष तथा लोकविकास आघाडीचे ‌सर्वेसर्वा ‌राजकिशोर मोदी यांची सहकार भवन येथे भेट घेतली. कामगारांनी त्यांना ‌थकीत वेतनासंबंधी माहिती देत त्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मोदी यांनी माझ्या हातात काही नाही, परंतू, तुमच्या ‌वेतनासाठी मी मुख्याधिकारी यांना विनंती ‌करतो, असे सांगितले. यावेळी ‌कामगारांनी‌ त्यांना ‌तुमच्या काळात आमचे वेतन थकले नाही, अशी‌‌ आठवण करुन दिली.