अंबाजोगाईकरांना विकतचे पाणी घेण्याची वेळ…!
टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मध्यस्थी करत कामगारांचे ‘कामबंद’ आंदोलन स्थगित केले असले तरी त्यांना शहरातील सुरळीत पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करता आले नाही, अशी जोरदार टीका करण्यात येत आहे. अंबाजोगाई शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरवासियांना विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत जनविकास शहर परिवर्तन आघाडीने अंबाजोगाई शहरातील जनतेला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जनतेने त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवीत त्यांना नगरपरिषदेची सत्ता दिली. गेल्या सहा महिन्यांपासून नगरपरिषदेत नंदकिशोर मुंदडा यांची एकहाती सत्ता आहे. परंतू, अजूनही त्यांंना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत : अंबाजोगाईकरांचे हाल…!
अंबाजोगाई शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नियमित वेळेत पाणी न मिळणे, कमी दाबाने पाणी येणे किंवा काही भागात अनेक दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाणीटंचाईमुळे अंबाजोगाईकरांना खासगी पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या मागणीकडे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा किती गांभीर्याने लक्ष देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



