टीम AM : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजाडला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
बीड जिल्ह्यातील लहान – मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25 टक्के इतकाच मर्यादित उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात केवळ तुरळक सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर पडल्या आहेत.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, जून अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ 10 ते 15 टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखे आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.



