अंबाजोगाई नगरपरिषदेवर आर्थिक संकट : मोदी – मुंदडा समर्थकात ‘सोशल वॉर’, नगराध्यक्षांचे मौन, वाचा…?

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपप्रणित जनविकास शहर विकास आघाडीसमोर अवघ्या सहा महिन्यांतच मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नगरपरिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी नगरपरिषदेच्या खात्यात निधी नसल्याची स्पष्ट कबुली दिल्याने शहरातील विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नगरपरिषदेच्या तिजोरीत निधीचा तुटवडा असल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली असून, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कंत्राटी संगणक चालकांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. वेतनाअभावी संबंधित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या कुटुंबीयांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न मिळाल्यास शहरातील मूलभूत सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात अंबाजोगाईकरांना स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मोदी – मुंदडा समर्थकात ‘सोशल वॉर’

नगरपरिषदेतील आर्थिक परिस्थिती गंभीर असताना सोशल मीडियावर मुंदडा आणि मोदी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे ‘सोशल वॉर’ सुरू आहे. मात्र, या राजकीय संघर्षात सामान्य नागरिक, तसेच वेतनापासून वंचित असलेले कर्मचारी भरडले जात असल्याची भावना अंबाजोगाईकरांमध्ये व्यक्त होत आहे. नगरपरिषदेची आर्थिक घडी कधी बसणार ? रखडलेले पगार कधी मिळणार ? आणि शहरातील विकासकामांना पुन्हा गती कधी मिळणार ? याकडे आता अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.

आर्थिक संकटावर नगराध्यक्षांचे मौन : अंबाजोगाईकरांमध्ये नाराजी

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आर्थिक संकटामुळे विकासकामे ठप्प झाली असून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. या गंभीर परिस्थितीत नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी नगरपरिषदेच्या खात्यात निधी नसल्याची कबुली दिली असली, तरी या संकटातून मार्ग काढण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, याबाबत अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांसह कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, आर्थिक संकटावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here