टीम AM : नागराज मंजुळे ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ नंतर ‘खाशाबा’ हा भव्य चित्रपट घेऊन येत असून, त्याचा टीझर रिलीज होताच 24 तासांत इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटातून स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची कोल्हापूरच्या लाल मातीतील संघर्षाची यशोगाथा मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. टीझरमध्ये अनेक नावाजलेले कलाकार दिसत असले, तरी मुख्य नायकाचा चेहरा समोर न आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे खाशाबा जाधव यांच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी कठीण ऑडिशन्सनंतर एका नवोदित आणि अपरिचित चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे, ज्याचे नाव अद्याप गुपित आहे. यापूर्वी नागराज मंजुळे यांनी जब्या आणि परश्या यांना लाँच करून कमालीची लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यामुळे आता या चित्रपटाच्या निमित्ताने ते कोणत्या नव्या अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या चित्रपटाला दिग्गज संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले असून जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी अशी कसलेल्या कलाकारांची मोठी फळी यात पाहायला मिळणार आहे. ‘जिओ’ स्टुडिओज आणि ‘आटपाट’ प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षित खाशाबा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.



