टीम AM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या आखणीतील 13 जिल्ह्यांमध्ये संयुक्त जमीन मोजणीचे काम वेगात सुरू आहे. ‘एमएसआरडीसी’ ने आतापर्यंत तब्बल 129 गावांमध्ये 100 टक्के मोजणी पूर्ण केली आहे. शेतकरी आणि महसूल यंत्रणेच्या सहकार्यामुळे सदरची मोजणी पूर्ण करणे शक्य झाल्याचे ‘एमएसआरडीसी’ ने स्पष्ट केले आहे.
पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) दरम्यान एकूण 856.765 कि.मी. लांबीचा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांतून हा द्रुतगती मार्ग जात असून, जिल्हाधिकारी प्रशासनाद्वारे 40 तालुक्यांतील 409 गावांमध्ये संयुक्त मोजणी प्रगतिपथावर आहे. 409 पैकी 129 गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे, तर 15 गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया अंशतः झाली आहे.
उर्वरित 265 गावांमध्ये संयुक्त मोजणी संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या नव्या सुधारित आराखड्याची अधिसूचना 5 मे 2026 ला राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. सुधारित आराखड्यानुसार संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू आहे.
विदर्भातील वर्धा, यवतमाळ, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, अंबाजोगाई, लातूर, धाराशिव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त मोजणी प्रगतिपथावर आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.



