रोहित पठारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम अनुयायी रस्त्यावर ! अंबाजोगाईत भव्य ‘जनआक्रोश’ मोर्चा…!

टीम AM : वैजापूर येथील रोहित पठारे या बौद्ध तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अंबाजोगाई ‌शहरात आज भीम अनुयायांच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. जोरदार घोषणाबाजी देत मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैजापूर येथे रोहित पठारे या बौद्ध तरुणाची गावगुंडांच्या टोळीकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला आघात नसून संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारी आणि समाजाला सुन्न करणारी आहे. अशा अमानुष घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा आंबेडकरी पक्ष आणि संघटनांच्या वतीने आम्ही तीव्र शब्दांत जाहीर निषेध करीत आहोत. आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे भव्य ‘जनआक्रोश’ मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत आमच्या मागण्या पोहोचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.  निवेदनावर भिमराव सरवदे, अक्षय भुंबे, राजेश वाहुळे, अमोल‌ पौळे, अशोक पाल्खे, बाबा मांदळे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक गंडले, नितीन सरवदे, परमेश्वर लांडगे, विनोद सिरसाट‌, दशरथ सोनवणे, दिपक कांबळे, प्रमोद दासूद यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. 

आंदोलकांनी खालील मागण्या केल्या आहेत.

1. रोहित पठारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून मोक्का (MOCCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

2. सदर प्रकरणाचा तपास निष्पक्ष व जलदगतीने पूर्ण करून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा.

3. दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, तसेच न्यायालयीन प्रक्रियेतून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रभावीपणे बाजू मांडण्यात यावी.

4. रोहित पठारे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.

5. राज्य शासनाच्या वतीने पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी.

6. पीडित कुटुंबाचे शासनामार्फत योग्य पुनर्वसन करण्यात यावे.

7. रोहित पठारे यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी.

8. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे करण्यात यावा.

9. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शासनाने या प्रकरणाचा नियमित आढावा घ्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here