पदवीधर मतदारसंघात रंगणार सामना : आमदार सतीश चव्हाणांविरोधात डॉ. नरेंद्र काळे मैदानात ? भेटीगाठींवर दिला भर…!

टीम AM : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत असून त्यांनी विविध ठिकाणी गाठीभेटीवर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतिष चव्हाण हे गेल्या तीन – चार‌ टर्मपासून‌ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतू, पदवीधरांच्या प्रश्नाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष करित कोणत्याही योजना त्यांच्यासाठी राबविल्या नसल्याचा आरोप सोशल ‌मिडियावर करण्यात येत आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या बद्दल उघड नाराजी पदवीधरांची दिसून येत आहे. दुसरीकडे डॉ. नरेंद्र काळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. राज्यातील डॉक्टरांचे‌, पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रश्न ‌सातत्याने त्यांनी सरकारसमोर मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल पदवीधरांचा सकारात्मक कल दिसून येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र काळे ‌यांनीही निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीवर भर दिला आहे. ‌

‘महायुती’ कडून सतिश चव्हाण यांची उमेदवार निश्चित ‌मानली जात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप उमेदवारी घोषित झालेली नाही. परंतू, डॉ. नरेंद्र काळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास पदवीधर मतदार संघात तगडी लढत पहायला मिळेल, हे मात्र निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here