टीम AM : आमदार नमिता मुंदडा प्रतिनिधित्व करत असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातील मौजे लाडेवडगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गावात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गावात पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने सहा जणांचा बळी गेला असल्याचा खळबळजनक आरोप राहुल शिंदे यांनी केला आहे.
या गंभीर आरोपामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गावातील पाणीप्रश्न आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लाडेवडगावच्या पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने ग्रामस्थांच्या वतीने अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि.16 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
लाडेगडगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले होते. हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, संबंधित कार्यालयाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे पूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गावातील ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, मागासवर्गीय दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय करावी, गावातील मागासवर्गीय मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच जलजीवन मिशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
या उपोषणात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल गिनाजी शिंदे, ज्येष्ठ नेते संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव विठ्ठल शेप, सुभाष दगडू शिंदे, हरिभाऊ मारुती शेप, गुलाब निवृत्ती शिंदे आणि छाया मुरलीधर उजगरे सहभागी झाले आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.



