बीड ‘महावितरण’ मधील 13 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई ; अधीक्षक अभियंत्यासह सहा जण निलंबित…!

चौकशी समितीच्या अहवालानंतर महावितरणमध्ये खळबळ

टीम AM : ‘महावितरण’ च्या बीड विभागातील कामांची कंत्राटे देताना आणि प्रत्यक्ष कामांमध्ये नियमांना हरताळ फासून सुमारे 13 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याच्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजपूत यांच्यासह कार्यकारी अभियंता आणि अन्य चार अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ‘महावितरण’ च्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

‘महावितरण’ च्या कामांची कंत्राटे देताना तसेच प्रत्यक्ष कामे करताना काही अधिकाऱ्यांनी मनमानी केली. नियमांचे उल्लंघन करून आर्थिक अनियमितता करण्यात आली असून, यामध्ये 13 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याची तक्रार आमदार विजयासिंह पंडित यांनी केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती.

आमदार पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी नियुक्त समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर ठपका ठेवला. त्यानंतर अखेर ‘महावितरण’ प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलत अधीक्षक अभियंता राजपूत यांच्यासह कार्यकारी अभियंता आणि अन्य चार अधिकारी – कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 13 कोटींपेक्षा अधिकच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी झालेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील महावितरणच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here