‘गर्दीश’ : बाप – मुलाच्या नात्याची भावनिक कहाणी…! 

टीम AM : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट आले ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले, परंतू, काही चित्रपट असे असतात की ते मनाला स्पर्श करून जातात. 1993 साली प्रदर्शित झालेला ‘गर्दीश’ हा असा एक चित्रपट आहे. बाहेरून हा चित्रपट गुन्हेगारी, संघर्ष आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईची कथा वाटत असली तरी त्याच्या केंद्रस्थानी आहे एक बाप आणि मुलाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि त्याग.

चित्रपटातील वडिलांची भूमिका अमरीश पुरी यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. ते एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार असतात. आपल्या मुलानेही प्रामाणिकपणा आणि सचोटीचा मार्ग स्वीकारावा, अशी त्यांची इच्छा असते व त्यांच्या पेक्षा मोठा पोलीस अधिकारी त्यांच्या मुलाने व्हावे अशी प्रामाणिक का होईना पण मनात त्यांच्या इच्छा असतेच. 

दुसरीकडे मुलाची भूमिका जकी श्रॉफ यांनी साकारली आहे. तो आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम करणारा, त्यांचा आदर करणारा आणि कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार असलेला तरुण असतो. परिस्थिती मात्र त्याच्या आयुष्याला वेगळे वळण देते. समाजातील भ्रष्ट व्यवस्था, गुन्हेगारी आणि अन्याय यामुळे त्याचे जीवन संघर्षमय बनते. अनेक अडचणी आणि संकटांमध्ये तो अडकतो. अशा वेळी वडिलांच्या मनात मुलाबद्दल असलेले प्रेम आणि काळजी अधिक तीव्रतेने दिसून येते. वडील आणि मुलगा दोघेही आपापल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती त्यांची कठीण परीक्षा घेते.

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे बाप – मुलाच्या नात्याचे वास्तववादी चित्रण. वडिलांचा शिस्तप्रिय स्वभाव, मुलाचे भावनिक मन आणि दोघांमधील परस्पर आदर यामुळे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतात. रक्ताचे नाते किती मजबूत असते आणि संकटांच्या काळात कुटुंबच माणसाची खरी ताकद असते, हा संदेश चित्रपट प्रभावीपणे देतो.

‘गर्दीश’ हा केवळ ॲक्शन किंवा ड्रामा चित्रपट नाही. तो कुटुंब, नाती, जबाबदारी आणि त्याग यांची हृदयस्पर्शी कथा आहे. वडिलांचे मुलावर असलेले निःस्वार्थ प्रेम आणि मुलाची वडिलांप्रती असलेली निष्ठा हे या चित्रपटाचे खरे वैशिष्ट्य आहे.

आजही हा चित्रपट पाहताना प्रेक्षक भावूक होतात. कारण काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी बाप – मुलाच्या प्रेमाचे नाते कधीच बदलत नाही. म्हणूनच हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक संस्मरणीय आणि भावनिक कलाकृती म्हणून ओळखला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here