स्वच्छता, पाणी पुरवठा कामगार तीन महिन्यापासून पगारापासून ‘वंचित’
टीम AM : नगरपरिषदेच्या निवडणूकीत मोठमोठ्या घोषणा करुन अंबाजोगाईकरांना ‘आयडियल सिटी’ चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपप्रणित जनविकास शहर विकास आघाडीला नगरपरिषदेची सत्ता हाकताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागताना दिसत आहे. अवघ्या सहा महिन्यात नगरपरिषदेला उतरती कळा लागली असून नगरपरिषदेच्या खात्यात छदामही नाही, अशी स्पष्ट कबूली नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मासिक सर्वसाधारण बैठकीत दिली आहे. त्यामुळे नगरपरिषदेची छोटी – मोठी काम तर सोडा विकासालाचं ‘ब्रेक’ लागला आहे. दुसरीकडे नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कंत्राटी संगणक चालकांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न अंबाजोगाईतील जनतेसमोर उभा राहण्याचे संकेत मिळत आहेत.
अंबाजोगाई नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठक दोन दिवसांपुर्वी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. ही बैठक चांगलीच वादळी ठरली. विरोधकांनी विकासाच्या प्रश्नांवर सताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. विकासकामांना निधी नाही, नगरसेवकांच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ऐकून घेत नाहीत, मुख्याधिकारी जागेवर नसतात, त्यामुळे जनतेची कामं कशी करायची ? असा सवाल विरोधकांनी केला. तसेच मराठा समाजाच्या मुला – मुलींसाठी सर्व्हे नंबर 17 मध्ये वसतिगृहाच्या मागणीसाठी जागा आरक्षित करावी आणि तसा ठराव पारित करावा, अशी मागणी नगरसेविका श्रूती लोमटे यांनी केली. यावरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. शेवटी विरोधकांनी हा विषय लावून धरल्याने ठराव पारीत झाला की नाही ? अजून त्यावर माहिती समोर आली नाही. नगरपरिषदेच्या काही विषयांना विरोधकांनी समर्थन दिले असले तरी वित्त आयोगाच्या पैशांतून कामगारांचे वेतन करण्यात यावे, असे महत्वाचे विषय प्रलंबित ठेवले आहेत.
206 कोटींची पाणीपुरवठा योजना रखडणार ?
अंबाजोगाई शहरातील जनतेला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने आमदार नमिता मुंदडा यांनी गेल्या टर्ममध्ये 206 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणली. या योजनेचे काम चालू असले तरी शासनाला नगरपरिषदेने भरावयाचा लोकसहभागाचा वाटा अद्याप भरला गेला नाही. हा वाटा जवळपास 20 कोटी रुपयांचा आहे. नगरपरिषदेत खडखडाट असताना हा वाटा कसा भरायचा ? असा प्रश्न नगरपरिषद प्रशासनासमोर उभा टाकला आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरासाठी महत्वकांक्षी असणारी पाणीपुरवठा योजना रखडण्याचे संकेत मिळत आहेत.



