टीम AM : नियमित व्यायाम आणि योगासनांमुळे आपले शरीर तंदुरुस्त व सुदृढ राहते, हा संदेश कृतीतून दाखवून देत अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी राजेंद्र घोडके यांनी जागतिक योग दिनानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांनी येथील काळवटी तलावात थेट पाण्यावर तरंगत विविध योगासने करून दाखवली. त्यांच्या या अनोख्या आणि थरारक योगसाधनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज सकाळच्या सुमारास हा उपक्रम पार पडला. वाढत्या वयातही आरोग्याचा संदेश देण्यासाठी घोडके यांनी काळवटी तलावाच्या संथ पाण्यात प्रवेश केला. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी पाण्यावर सहजपणे तरंगत योगासनांची अवघड प्रात्यक्षिके सादर केली. पाण्यात शरीराचा समतोल राखत केलेली ही योगसाधना डोळे दिपवणारी ठरली.
यावेळी उपस्थितांशी बोलताना राजेंद्र घोडके यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास आपले शरीर सुदृढ राहते आणि मानसिक ताणतणाव दूर होतो. वयाची अट न ठेवता प्रत्येकाने योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.
एक सेवानिवृत्त कर्मचारी असूनही घोडके यांनी दाखवलेली ही स्फूर्ती आणि शारीरिक लवचिकता आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी मानली जात आहे. काळवटी तलावात त्यांची ही आगळीवेगळी ‘योगसाधना’ पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या अंबाजोगाई शहरासह संपूर्ण परिसरात राजेंद्र घोडके यांच्या या जल – योगसाधनेची आणि त्यांच्या आरोग्याप्रती असलेल्या जागरूकतेची जोरदार चर्चा सुरू आहे.



