मराठवाडा हादरला : गणपतीपुळेत पाच युवक बेपत्ता, मानवतमध्ये सभामंडप कोसळून चौघांचा मृत्यू, वाचा…!

टीम AM : राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवकांचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली, तर परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका मंदिराचा सभामंडप कोसळून चार भाविकांचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील 19 पर्यटक गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेले होते. यापैकी आठ युवक शनिवारी सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने सर्वजण अडचणीत सापडले.

स्थानिक बचाव पथक आणि नागरिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने आणि यश कांबळे हे पाच युवक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व युवक 19 ते 22 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बेपत्ता युवकांच्या शोधासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.

मानवतमध्ये मंदिराचा सभामंडप कोसळला

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे असलेल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना घडली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असताना निर्माणाधीन मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला. या दुर्घटनेत 4 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी नागरिक आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दोन्ही घटनांमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून संबंधित ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here