लाइचाट पॉल वांगपान : ‘नाईट वॉचमन’ पासून ‘मेजर’ होण्यापर्यंतचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी, वाचा…!

टीम AM : कधीकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रात्रभर पहारेकऱ्याचे काम करत होते. आज भारतीय सैन्यात ‘मेजर’ बनून त्यांनी इतिहास रचला आहे.

अरुणाचल प्रदेशातील लाँगडिंग जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या लाइचाट पॉल वांगपान यांना आर्थिक अडचणींमुळे 8 वी नंतर शिक्षण सोडावं लागलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी रात्रीच्या वेळी पहारेकरी (नाईट वॉचमन) म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

मात्र, त्यांची स्वप्नं यापेक्षा खूप मोठी होती. त्यांनी भारतीय सैन्यात सैनिक म्हणून भरती होत आपल्या प्रवासाला नवी दिशा दिली. सैन्यात सेवा बजावत असतानाही त्यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही. कर्तव्य पार पाडल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत ते अभ्यास करत, परीक्षांची तयारी करत आणि ‘एसएसबी’ साठी अथक मेहनत घेत राहिले. याच जिद्दीमुळे 2020 मध्ये ते वान्चो समुदायातील पहिले ‘कमिशंड आर्मी ऑफिसर’ बनले. आणि आता जून 2026 मध्ये त्यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

लाइचाट पॉल वांगपान यांना ‘मेजर’ पदावर पदोन्नती झाली असून, हा मान मिळवणारे ते त्यांच्या समुदायातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांची कहाणी सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं. एका नाईट वॉचमन पासून मेजर होण्यापर्यंतचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here