टीम AM : भारतीय हवामान विभागाच्या अपेक्षेपेक्षा ‘अल निनो’ अधिक वेगाने सक्रिय झाला आहे. सक्रिय झालेल्या ‘अल निनो’ चे चटके मान्सूनला आत्तापासूनच बसू लागले आहेत. मे महिन्यात जेव्हा पहिल्यांदा ‘अल निनो’ चे रिपोर्टस आले होते. तेव्हा याबद्दल केवळ अंदाज मांडले गेले होते.
प्रशांत महासागर गरम होत होता आणि भारतीय हवामान विभाग सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल इशारा देत होता. आता जून महिना अर्धा उलटून गेल्यावर हे दोन्ही अंदाज खरे ठरले आहेत. अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ ने 11 जून रोजी ‘अल निनो’ सक्रिय झाल्याची घोषणा करत एक अॅडव्हायझरी (मार्गदर्शक सूचना) जारी केली.
हिवाळ्यापर्यंत हा ‘अल निनो’ अत्यंत तीव्र रूप धारण करण्याची 63 टक्के शक्यता या संस्थेने वर्तवली आहे. हवामान विभागाने यंदा अपुरा पाऊस पडण्याची शक्यता 35 टक्क्यांवरून थेट 60 टक्क्यांवर नेली आहे. तसेच, मान्सून सामान्यपेक्षा कमी किंवा त्याहूनही वाईट राहण्याची शक्यता 84 टक्क्यांवर पोहोचली आहे.



