टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेत आज लोकविकास महाआघाडीच्या नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून तीव्र निषेध नोंदवला. मुख्याधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने शहरातील विकासकामे, प्रशासकीय प्रक्रिया आणि नागरिकांची विविध कामे ठप्प झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. लोकविकास महाआघाडीचे उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेवक महेश लोमटे, नजीर पठाण, राजपाल जावळे यांच्यासह नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हे आंदोलन केले.
जनतेच्या समस्या आणि प्रभागातील प्रश्न घेऊन वारंवार कार्यालयात जावे लागते, मात्र मुख्याधिकारी बहुतेक वेळा अनुपस्थित असल्याने फाईली प्रलंबित राहत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
नगरसेवकांनी आरोप केला की, शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांबाबतचे निर्णय आणि मंजुरी रखडल्याने प्रशासनाचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाही अधिकाऱ्यांची भेट मिळत नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. “जोपर्यंत मुख्याधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या कामांना न्याय देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा लोकविकास महाआघाडीच्या नगरसेवकांनी दिला.
या आंदोलनामुळे नगर परिषदेतील प्रशासकीय कारभार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून अंबाजोगाईकरांमधून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.



