अमिताभ यांच्या ‘या’ सीनमधील 4 वाक्यांसाठी मोहम्मद रफींनी दिलेला आवाज, शब्द ऐकून आजही येते डोळ्यात पाणी, वाचा…!

टीम AM : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांनी कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. मात्र 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या सुपरहिट चित्रपटातील अवघ्या चार ओळींनी इतिहास घडवला.

या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिले होते. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. मात्र चित्रपटाच्या भावनिक क्लायमॅक्ससाठी संगीतकारांना अशा आवाजाची गरज होती, जो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडेल. त्यासाठी त्यांनी मोहम्मद रफी यांची निवड केली.

सुरुवातीला रफी यांनी आश्चर्य व्यक्त करत, सर्व गाणी किशोर कुमार गात आहेत, मग या ओळी त्यांच्याकडूनच का गाऊन घेत नाही ? असा प्रश्न विचारला. त्यावर आनंदजी यांनी सांगितले की, त्या चार ओळींमध्ये लागणारी वेदना आणि भावनिक खोली केवळ रफी यांच्या आवाजातूनच व्यक्त होऊ शकते.

यानंतर रफी यांनी कोणताही विचार न करता गाण्यास होकार दिला. विशेष म्हणजे, त्यांनी या चार ओळींसाठी कोणतेही मानधन स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हे रेकॉर्डिंग विनामूल्य केले.

‘जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी… मौत महबूबा है, अपने साथ लेकर जाएगी…’ या ओळी आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेच्या मृत्यूच्या प्रसंगात वापरण्यात आलेल्या या गाण्याने चित्रपटाचा भावनिक प्रभाव अनेकपटींनी वाढवला.

आजही ‘मुकद्दर का सिकंदर’ चा क्लायमॅक्स आणि रफी यांच्या आवाजातील या चार ओळी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. त्यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक मानले जाते.

2 मिनिट 35 सेकंदाचा सीन, ज्याच्यामध्ये मोहम्मद रफी यांनी 4 वाक्यांसाठी दिलेला आवाज ऐकून थिएटरमध्ये बघणाऱ्यांच्या डोळ्यात‌ पाणी आले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here