टीम AM : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांनी नुकतीच भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
बीड – लातूर – धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजकिशोर मोदी यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील विविध पोस्ट आणि राजकीय अंदाज व्यक्त केले जात असून, मोदी यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ च्या उमेदवार म्हणून लढलेल्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देत राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरासह परिसरात सक्रियपणे काम केल्याची चर्चा होती. त्यांच्या समर्थकांनीही निवडणुकीदरम्यान ‘महायुती’ च्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केल्याचे सांगितले जाते. अलीकडेच झालेल्या पंकजा मुंडे आणि राजकिशोर मोदी यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले असून, मोदी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार का ? याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, राजकिशोर मोदी यांच्या पुढील निर्णयाकडे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.



