टीम AM : अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात एका तरुणाच्या मृत्यूनंतर संबंधित महिलेनेही परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील तरुण आणि त्याच्या सावत्र आईमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी दोघेही घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने दोघांचा शोध घेऊन त्यांना परत आणले. त्यानंतर संबंधित तरुणाने विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती समोर आली.
प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान चार दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेनेही टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. रुग्णालय परिसरातील सभागृहाच्या पाठीमागील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



