अंबाजोगाई कनेक्शन असलेल्या डॉ. प्रसाद बिवरेंच्या ‘देऊळबंद – 2’मधील गाण्यांची महाराष्ट्रभर चर्चा, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाईच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक भूमीशी ऋणानुबंध असलेल्या गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांनी पुन्हा एकदा आपल्या लेखणीतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित ‘देऊळबंद- 2’ चित्रपटातील गाण्यांना सध्या महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटातील तीन महत्त्वपूर्ण गाणी डॉ. प्रसाद बिवरे यांनी लिहिली आहेत.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. बिवरे यांचे अंबाजोगाईशी विशेष नाते आहे. त्यांचे ‘एमबीबीएस’ आणि ‘एमडी’ चे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे झाले. वैद्यकीय शिक्षण घेताना महाविद्यालयाच्या ‌विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यामुळे अंबाजोगाईच्या मातीत घडलेल्या या प्रतिभावान गीतकाराच्या यशाचा आनंद शहरवासीयांनाही होत आहे.

‘देऊळबंद – 2’ मधील डॉ. बिवरे यांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश आहे. ‘माऊली… माऊली…’ या स्वामी समर्थांच्या आरतीत त्यांनी शेतशिवारातील विविध पिकांचा उल्लेख करत भक्ती आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम साधला आहे. दुसरे गीत पथनाट्याच्या शैलीतील असून त्यात एका शेतकऱ्याची पत्नी स्वामी समर्थांशी संवाद साधताना दिसते. तर तिसरे गाणं जत्रेच्या पारंपरिक ढंगातील असल्याने ते विशेष चर्चेत आले आहे. या गीतांना संगीतकार तन्मय भिडे आणि ऋतुराज साठे यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, अवधूत गुप्ते आणि चंदन कांबळे यांनी ही गाणी आपल्या आवाजात साकारली आहेत.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर – 2’, ‘फुलवंती’ आणि आता ‘देऊळबंद – 2’ या चित्रपटांमध्ये डॉ. प्रसाद बिवरे यांनी गीतकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रवीण तरडे आणि डॉ. बिवरे यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरत असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात रंगली आहे.

अंबाजोगाईशी जुळलेले नाते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील वाढता ठसा यामुळे डॉ. प्रसाद बिवरे यांच्या पुढील वाटचालीसाठी आता अंबाजोगाईकरही शुभेच्छा देत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here