टीम AM : पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यातील एका अतिदुर्गम आदिवासी पाड्यात वाढलेली अस्मिता आज हजारो मुलींसाठी प्रेरणेचा दीप बनली आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता, पडकं घर, पाण्यासाठी रोजची वणवण आणि अत्यंत कठीण परिस्थिती. पण या सगळ्यांवर मात करत तिने महाराष्ट्र पोलीस दलाची खाकी वर्दी मिळवली.
अस्मिताच्या घरात पैशांची कमतरता होती, पण स्वप्नांची नाही. कष्टकरी आई – वडिलांनी परिस्थितीशी झुंज देत मुलीच्या शिक्षणाला आधार दिला. कोणत्याही मोठ्या सुविधा नसताना तिने गावातील कच्च्या रस्त्यांवर धावत, मैदान नसताना मोकळ्या जागेत सराव करत पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली.
अनेक अडचणी आल्या, थकवा आला, संघर्ष वाढला, पण अस्मिताने हार मानली नाही. तिच्या डोळ्यांतील खाकी वर्दीचं स्वप्न तिला रोज नव्या ताकदीने उभं करत राहिलं. अखेर तिच्या मेहनतीचं सोनं झालं आणि तिचं नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत झळकलं. संपूर्ण गावासाठी तो अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.
अस्मिताचं यश केवळ तिचं वैयक्तिक यश नाही ; ते दुर्गम भागातील प्रत्येक आदिवासी मुलीच्या स्वप्नांना बळ देणारं आहे. परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न गरीब नसतात, हे तिने सिद्ध केलं आहे.



