टीम AM : अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांना विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लातूर – बीड – धाराशिव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बीड जिल्ह्यासह विविध भागांतून जोर धरत आहे.
राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांशी कायम संपर्क ठेवत काम केल्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
दिवंगत बाबूराव आडसकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून कार्य करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक निष्ठावंत चेहरा म्हणून राजकिशोर मोदी यांच्याकडे पाहिले जाते. सर्व जाती – धर्मांना सोबत घेऊन चालणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे नेतृत्व म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून सक्षम आणि जनाधार असलेल्या उमेदवाराचा शोध सुरू असून, राजकिशोर मोदी यांचे नाव चर्चेत आले आहे. बीड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, सोशल मिडीयावर देखील राजकिशोर मोदी यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ पोस्ट आणि संदेश मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून, कार्यकर्त्यांनी प्रचाराची सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी राजकिशोर मोदी यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.



