धक्कादायक : ‘स्वाराती’ चे डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी तलावात बुडून मृत्यू

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भूलतज्ञ विभागाचे विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 19 मे) सकाळी घडली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अभिमन्यू तरकसे हे दररोजप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी काळवटी साठवण तलाव परिसरात गेले होते. पोहत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते पाण्यात बुडाले, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी व संबंधितांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, त्यांना वाचविण्यात अपयश आले.

डॉ. अभिमन्यू तरकसे हे ‘स्वाराती’ मधील अनुभवी व कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सहकारी डॉक्टर, कर्मचारी व मित्रपरिवारांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर…!

अंबाजोगाई जवळील धावडी गावचे रहिवासी असलेले डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली. पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी ‘भूलशास्त्र’ विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच संस्थेत ‘ज्युनिअर रेसिडेंट’ म्हणून रुजू झालेले डॉ. तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here