अंबाजोगाईतून जाणाऱ्या ‘शक्तिपीठ’ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला : काय झालेत बदल ? वाचा…!

टीम AM : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रकल्पाच्या आराखड्यात पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यानुसार, महामार्गाची लांबी आता 802 किलोमीटरवरून वाढून 856 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. मार्गात करण्यात आलेल्या बदलांमुळे महामार्गाची लांबी तब्बल 54 किलोमीटरने वाढली आहे. ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‌हा अंबाजोगाई ‌तालुक्यातून जाणार आहे.

नव्या आराखड्यात सातारा जिल्हा तसेच चंदगड परिसराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी या महामार्गाला तीव्र विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आता भूमिका बदलत महामार्ग आपल्या भागातून न्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

13 जिल्ह्यांतून जाणार महामार्ग

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील सुमारे 12 ते 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. यात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

साडेतीन शक्तिपीठांचाही समावेश…!

या महामार्गामुळे कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर या साडेतीन शक्तिपीठांसह तीन ज्योतिर्लिंगे आणि 18 प्रमुख तीर्थक्षेत्रे परस्पर जोडली जाणार आहेत. तसेच नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी सध्याच्या 18 ते 20 तासांवरून थेट 8 ते 10 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.