‘मुख्यमंत्री पाणंद रस्ता’ : अंबाजोगाईतील रस्ता तीन वर्षांपासून रखडला, शेतकऱ्यांनी ‌व्यक्त केला तीव्र संताप

टीम AM : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री पाणंद रस्ता योजना’ सुरु केली.‌ मात्र, अंबाजोगाई तालुक्यात फक्त कागदावरच योजना असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. पोखरीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याला मंजुरी मिळून तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी आजपर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. काही काळ काम सुरू झाले. मात्र, नंतर वारंवार बंद पडत गेले. आजही रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून, जे काम झाले आहे तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

सध्या पावसाळा तोंडावर आला असून, परिसरातील नदी – नाले भरल्यास शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अपूर्ण रस्त्यामुळे शेतात जाणे कठीण होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधल्यास “आज करतो, उद्या करतो” अशी उत्तरे दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामाला गती मिळत नाही. तीन वर्षांपासून सुरू असलेला हा विलंब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा ही योजना केवळ घोषणांपुरती आणि कागदोपत्रीच मर्यादित असल्याची भावना अधिक तीव्र होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here