टीम AM : निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर साध्या नगरसेवकांपासून ते आमदार, मंत्री लाखो – कोट्यवधी रुपयांची माया जमविण्यात मग्न होतात. मोक्याच्या जागा, आलिशान फ्लॅट आणि सत्तेच्या बळावर वैभवशाली जीवन उभारणे हीच अनेकांची महत्त्वाकांक्षा बनलेली दिसते. अशा वातावरणात केरळचे माजी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी मात्र आपला साधेपणा कायम ठेवत एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) केरळ विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर वरिष्ठ ‘सीपीआय’ (एम) नेते पिनरायी विजयन भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेले आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
दिल्ली येथे झालेल्या ‘सीपीआय’ च्या (एम) पॉलिट ब्युरो बैठकीत सहभागी झाल्यानंतर विजयन रात्री तिरुअनंतपुरममधील बेकरी जंक्शन परिसरातील भाड्याच्या घरात दाखल झाले. यावेळी त्यांचे जावई आणि माजी मंत्री पीए मोहम्मद रियास तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते वी. शिवकुट्टी यांनी नव्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले.
निवडणुकीच्या निकालानंतर विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘क्लिफ हाऊस’ रिकामे केले होते. ‘सीपीआय’ (एम) पक्षाने त्यांना पक्षाच्या मालकीच्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची ऑफर दिली होती. मात्र, विजयन आता आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहणार आहेत.



