टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यात एकूण 15 पेट्रोल पंप असून त्यापैकी 6 शहरात तर 9 ग्रामीण भागात आहेत. सलग 1 मेपासून सुट्ट्या आल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल – डिझेलचा पुरवठा खंडित झाला होता. परिणामी, पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.
कंपन्यांकडून वेळेत पुरवठा न होणे आणि ट्रान्सपोर्टमधील अडचणी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांना मागील दोन – तीन दिवस मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला, अशी माहिती तहसीलदार विलास तरंगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
तहसीलदार विलास तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकाने सर्व पेट्रोल पंपांची पाहणी करून साठा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या अंबाजोगाई शहरातील तीन पेट्रोल पंप सुरू असून घाटनांदूर येथील दोन पंपही कार्यरत आहेत. पाटोदा, लोखंडी आणि बर्दापूर येथील पंप सध्या स्टॉकअभावी बंद असले तरी आज संध्याकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी इंधन उपलब्ध होईल, अशी माहिती तहसीलदार तरंगे यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार तरंगे यांनी नागरिकांना आवाहन केले की, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वत्र एकाच वेळी ताण निर्माण होत असल्याने व्यवस्थापनावर दबाव वाढत आहे. इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंप चालक आणि कंपनी प्रतिनिधींसोबत समन्वय साधून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, कोणी साठेबाजी करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, ‘अंबाजोगाई मिरर’ ने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत.



