अंबाजोगाईत इंधन टंचाई तीव्र : लोकप्रतिनिधी लग्नसमारंभात व्यस्त, सामान्य जनता मात्र त्रस्त, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई शहर व तालुक्यात पेट्रोल – डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असताना, एकीकडे पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे संतप्त अंबाजोगाईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अंबाजोगाईतील बहुतांश पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्याने कालपासून अनेक पंप बंद होते. आज सकाळी काही मोजके पंप सुरू झाल्यानंतर तेथे अल्पावधीतच प्रचंड गर्दी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी किरकोळ वादविवादाचे प्रकारही घडत असून परिस्थिती तणावपूर्ण बनत आहे. इंधन टंचाईचा फटका केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर रुग्णवाहिका सेवा, शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गालाही बसत आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या सर्व परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक लोकप्रतिनिधी सध्या लग्नसमारंभ आणि खासगी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासन व पुरवठा विभागाकडूनही कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, योग्य नियोजन करून पंपांवरील गर्दी नियंत्रणात आणावी आणि लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here