अंबाजोगाईत इंधन टंचाई तीव्र : पेट्रोल पंपांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…!

टीम AM : अंबाजोगाई शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, पेट्रोल पंपांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक तसेच व्यावसायिक वर्ग त्रस्त झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाईतील बहुतांश पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल साठा पूर्णतः संपला आहे. कालपासून अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आज सकाळी काही मोजके पंप सुरू झाले असले तरी त्या ठिकाणी अल्पावधीतच मोठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडल्याची माहिती समोर येत आहे.

इंधन टंचाईमुळे रुग्णवाहिका सेवा, मालवाहतूक तसेच दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. या परिस्थितीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या गंभीर समस्येकडे अंबाजोगाई तालुका प्रशासन आणि पुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना किंवा पर्यायी व्यवस्था दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, पंपांवर योग्य नियोजन करावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here