अंबाजोगाईत उष्णतेची लाट तीव्र : तापमान 40 अंशांवर …!

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

टीम AM : अंबाजोगाई शहरात उष्णतेची लाट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून नागरिकांची चिंता वाढली आहे. काल आणि आज तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून आज कमाल तापमान थेट 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून दुपारच्या वेळेत रस्तेही ओस पडताना दिसत आहेत.

तज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर ताण येऊन हीट स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजार असलेल्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. योग्य काळजी न घेतल्यास उष्माघातामुळे मृत्यूचाही धोका संभवतो.

दरम्यान, नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

▪️ दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे

▪️ भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे

▪️हलके, सैल व सूती कपडे परिधान करावेत

▪️ डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा

▪️ उन्हात दीर्घकाळ काम करणे टाळावे

▪️ लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा

अंबाजोगाई तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, प्रत्येकाने काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here