भारताची जनगणना 2027 : बीड जिल्ह्यात 1 मे पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात…!

डिजिटल माध्यमाद्वारे नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

टीम AM : बीड जिल्ह्यामध्ये भारताची जनगणना 2027 चा पहिला टप्पा 1 मे पासून सुरू होत असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असून 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्व-गणना म्हणजेच ‘सेल्फ इन्युमरेशन’ करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी ही जनगणना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने प्रत्येक नागरिकाने आपली माहिती अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे.

नागरिक आपल्या मोबाईलवरून संबंधित संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करू शकतात. या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्यासाठी 33 महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. ही माहिती भरल्यानंतर नागरिकांना 11 अंकी ‘एससी कोड’ प्राप्त होईल. 15 मे नंतर जेव्हा प्रगणक घरोघरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा कोड दिल्यास नागरिकांनी पोर्टलवर भरलेली माहिती थेट डेटाबेसमध्ये समाविष्ट केली जाईल.

जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी स्पष्ट केले की, ही जनगणना भविष्यातील शासकीय योजना, धोरणे आणि संसदीय निर्णयांसाठी पाया ठरणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतः या उपक्रमात सहभागी व्हावे आणि इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here