टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच हा स्फोट झाला. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पट्टीवडगाव येथील बालासाहेब जाधव यांच्या पत्नी पार्वतीबाई जाधव यांचे 12 एप्रिल 2026 रोजी कॅन्सरने निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून स्वयंपाकाची तयारी सुरू असताना सुमारे 9.30 वाजता स्वयंपाकाच्या भट्ट्याने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच भट्ट्याला जोडलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, माळवदाच्या घराला तात्काळ आगीने वेढा घातला. घराचे लाकडी बांधकाम असल्याने आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. ही आग शेजारील दुसऱ्या घरातही पसरली. परिणामी दोन्ही घरांतील धान्य, कपडे, भांडी तसेच इतर संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या.
सकाळच्या वेळी झालेल्या या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, पत्नीच्या निधनाचे दुःख असतानाच राहते घर आणि सर्व संसार जळून खाक झाल्याने बालासाहेब जाधव यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कुटुंब आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचले आहे. दरम्यान, महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.



