अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील शेतकरी रस्त्यासाठी आक्रमक
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील शेतकरी रस्त्याअभावी प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता नसल्यामुळे यंदा 250 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी आता सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला असून, यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी ‘पडीक’ राहण्याची भीती
पावसाळा तोंडावर आला असून पेरणीची तयारी सुरू आहे. मात्र, डोंगर पिंपळा शिवारातील पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्ता नसल्याने शेतात बी-बियाणे, खते किंवा ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले आहे. “जर रस्ता नसेल तर आम्ही पेरणी कशी करणार? पेरणी झाली नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल,” अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, रस्ता नसल्यामुळे ट्रॅक्टर चालकांना दुसऱ्या लांबच्या मार्गाने यावे लागते. यासाठी ट्रॅक्टर चालक एकरी 400 रुपये जास्तीचा भाव मागत आहेत. आधीच अस्मानी संकटाने खचलेल्या शेतकऱ्याला आता या वाढीव आर्थिक भुर्दंडामुळे मोठा फटका बसत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत टीका केली आहे. “नेते केवळ मतदानाच्या वेळी येतात, आश्वासनं देतात आणि खुर्चीवर बसले की विसरतात,” असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनाही वारंवार निवेदने देण्यात आली, परंतु “त्या मोठ्या नेत्या असल्याने आमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही,” असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ‘पांदण रस्ते काढू’ असं म्हणणाऱ्या बावनकुळे यांच्या घोषणाही हवेतच विरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी आजवर महसूल विभाग आणि संबंधित सर्व विभागांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्यापही रस्ता तयार झालेला नाही. “शासनाने आमची सहनशीलता पाहू नये. पेरणी सुरू होण्यापूर्वी हा पांदण रस्ता व्यवस्थित करून द्यावा, अन्यथा आमच्याकडे सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,” असा इशारा डोंगर पिंपळा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या गंभीर इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार का ? आणि पावसाळ्यापूर्वी या शेतकऱ्यांना रस्ता मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



