‘स्वाराती’ परिसरातील उघड्या ड्रेनेजमुळे अपघात : महिला – चिमुरडी थोडक्यात बचावल्या, वाचा…!

टीम ‌AM : स्वामी रामानंद तीर्थ (‘स्वाराती’) रुग्णालय परिसरातील नर्सेस क्वार्टरजवळ काल सांयकाळी एक थरारक घटना घडली. रस्त्यावर ड्रेनेजचा 12 फुट खड्डा उघडा असल्याने एक महिला व लहान मुलगी त्यात पडल्याची घटना समोर आली आहे. 

सुदैवाने, परिसरातील नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघींनाही वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, परिसरात अनेक ड्रेनेज उघडे असून ‘स्वाराती’ प्रशासन आणि बांधकाम विभागाने याकडे गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे ‘स्वाराती’ प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून “एखाद्याचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का?” असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

‘स्वाराती’ परिसरात उघड्या ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून यावरून संताप व्यक्त होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, अंबाजोगाईच्या वतीने ‘स्वाराती’ प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच उघडे ड्रेनेज तात्काळ बंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here