टीम AM : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेअंतर्गत eKYC दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या महिलांकडून eKYC प्रक्रियेत चुका झाल्या होत्या, त्यांना आता दुरुस्ती करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना eKYC दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या महिलांनी अद्याप eKYC दुरुस्ती केलेली नाही त्यांनी 30 एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यांच्या यादीतून त्यांचे नाव वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे त्यांनी दिलेल्या मुदतीतच eKYC दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



