जनतेची कामं जिथल्या तिथं पार पाडण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न : मंत्री पंकजा मुंडें  

मंत्री पंकजा मुंडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

टीम AM : जनतेची सर्व कामे जिथल्या तिथे पार पाडावी, यासाठी सुसज्ज यंत्रणा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे‌ प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर भागात मंत्री पंकजा मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. जनसंपर्क कार्यालय उभं करण्यासाठी भाजपचे गणेश कराड यांनी पुढाकार घेतला. अत्यंत सुसज्ज आणि प्रशस्त असलेल्या या कार्यालयाचे कौतूकही पंकजा मुंडे यांनी केले.

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार ,युवा नेते अक्षय मुंदडा, माजी मंत्री बालासाहेब दोडतले, गयाताई कराड, संतोष हंगे, सलीम जहांगीर, आदित्य सारडा, युद्धजित पंडित, माधव निर्मळ, गणेश कराड आदींसह मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यभरातून मला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांचा मोठा जनसमुदाय असतो. यामध्ये सामान्य माणसाला भेटताना एकाच वेळी गर्दी झाल्याने धावपळ होते व कामेही नीट करता येत नाहीत. याला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे व कामांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. या दृष्टीकोनातून आपण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एक सशक्त व सर्व उपयोगी अशी यंत्रणा उभी करत आहोत. या अनुषंगाने अंबाजोगाई येथील हे संपर्क कार्यालय आहे, जनतेची छोटी – मोठी सर्व कामे या ठिकाणावरून करणार आहे. लवकरच बीड येथेही अशाच पद्धतीचे संपर्क कार्यालय व जनतेच्या कामांसाठीची यंत्रणा आपण उभी करणार आहोत, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले. 

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार, युवा नेते अक्षय मुंदडा, माजी मंत्री बालासाहेब दोडतले, सलीम जहांगीर यांचीही समयोचित भाषणं झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भगत यांनी केले तर सूत्रसंचालन गित्ते यांनी केले. उपस्थितांचे आभार गणेश कराड यांनी मानले. यावेळी भाजपाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here