ॲड. इस्माईल गवळींसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले : उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयात ‌ॲड. इस्माईल गवळी यांना सुरक्षारक्षककांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व पक्षीय नेत्यांनी आवाज उठवत ‘स्वाराती’ प्रशासनाला जाब विचारला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून ‘स्वाराती’ प्रशासनाने मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांना 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते आणि वरिष्ठांना ‌अहवाल सादर करण्याचे‌ आश्वासन ‌दिले होते. परंतू, माशी‌ कुठे शिंकली माहित नाही. कालचं ॲड. इस्माईल गवळी यांच्यावर शासकीय कामात ‌अडथळा आणल्याप्रकरणी 353‌ चा गुन्हा दाखल ‌करण्यात आला. या घटनेमुळे ॲड. इस्माईल गवळी यांच्या समर्थकात आणि हितचिंतकात संतापाची लाट उसळली. 

खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज दिनांक 27 मार्च शुक्रवार रोजी सदर बाजार चौकातून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. “खोटे गुन्हे मागे घ्या” अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मोर्चात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, राजेसाहेब देशमुख, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश ‌वाहुळे, रमिज‌‌ सर, सामाजिक कार्यकर्ते ‌हमीद चौधरी, महेंद्र निकाळजे, भिमराव सरवदे, अशोक पाल्खे, सुनिल जगताप, मदन परदेशी, धिमंत राष्ट्रपाल यांच्यासह लोकविकास महाआघाडीचे नगरसेवक व विविध ‌पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलकांच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, ॲड. इस्माईल गवळी यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, तसेच मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अंबाजोगाईत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण…?

‘स्वाराती’ रुग्णालयात एका रिक्षाचालकाला किरकोळ कारणावरून सुरक्षारक्षकांकडून मारहाण केली जात होती. ही घटना थांबवण्यासाठी पुढे सरसावलेल्या ॲड. इस्माईल गवळी यांनाही सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली आणि ॲड. इस्माईल गवळी यांच्या समर्थकांनी ‘स्वाराती’ प्रशासनाला धारेवर धरलं ‌होतं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here