हृदयद्रावक : कापसी फाट्यावर भीषण दुर्घटना, अंबाजोगाई तालुक्यातील माय – लेकराचा जळत्या कारमध्ये करुण अंत…!

टीम AM : बीड – अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कापसी फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी भीषण दुर्घटना घडली. खडीने भरलेल्या भरधाव हायवा टिपरने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारने तत्काळ पेट घेतला.

या भीषण आगीत कारमधील ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय 26) आणि त्यांची आई पुष्पा श्रीहरी पुरी (वय 50) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृत माय – लेकरं मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील असून सध्या केज तालुक्यातील साळेगाव येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की, कारमधील इंधनाचा भडका उडून काही क्षणातच वाहन आगीच्या गोळ्यात परिवर्तित झाले. त्यामुळे दोघांनाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र, आगीच्या तीव्रतेमुळे बचावकार्य करणे अशक्य ठरले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here