बीडमध्ये सिग्नल यंत्रणा होणार कार्यान्वित : अंबाजोगाईत कधी लागणार शिस्त ?

टीम AM : बीड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या निर्णयामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, अंबाजोगाईत मात्र वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्यामुळे “अंबाजोगाईत सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अंबाजोगाई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालकांमध्ये शिस्त दिसून येत नाही. परिणामी, “मी जाऊ का? तू जा?” अशा गोंधळातून अनेक ठिकाणी किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक आणि यशवंतराव चव्हाण चौक या प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. पूर्वी या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती दिसत होती, मात्र, सध्या तीही कमी झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

बंद पडलेले सिग्नल पुन्हा सुरू करण्याची मागणी

अंबाजोगाई शहरात काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात ती सुरळीत सुरू होती आणि वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा बंद पडली. नंतर नगरपरिषदेकडून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण नियंत्रणाच्या प्रश्नावरून ती पुन्हा बंद करण्यात आली. आजही शहरातील अनेक चौकांमध्ये सिग्नल उभे असले तरी ते केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या यंत्रणा पूर्ववत सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

आमदार नमिता मुंदडा पुढाकार घेणार ?

बीडमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होत असताना अंबाजोगाईतही तातडीने अशाच उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी पुढाकार घेतल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here