‘स्वाराती’ त राडा : ॲड. इस्माईल गवळी यांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण, संबंधितांवर‌ होणार कारवाई, वाचा…!

15 दिवसांची सक्तीची रजा, अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार ‌- अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ (‘स्वाराती’) रुग्णालयात आज दुपारी मोठा गोंधळ उडाला. सामाजिक कार्यकर्ते ॲड. इस्माईल गवळी यांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह गवळी यांच्या समर्थकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वेळातच परिसरात मोठी गर्दी जमून परिस्थिती चिघळली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका रिक्षाचालकाला किरकोळ कारणावरून सुरक्षारक्षकांकडून मारहाण केली जात होती. ही घटना थांबवण्यासाठी पुढे सरसावलेल्या ॲड. इस्माईल गवळी यांनाही सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली असून उपस्थितांनी संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. 

सुरक्षारक्षकांवर कारवाई करावी : ॲड. गवळी 

दरम्यान, मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. गवळी यांनी केली आहे. घटनेनंतर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, शेख रहिम, डॉ. नरेंद्र काळे, अमर देशमुख, शेख रमिज यांच्यासह अनेक नगरसेवकांनी अधिष्ठाता कार्यालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी सुरक्षा प्रमुख सोळंके यांनाही बोलावण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सुरक्षारक्षकांना 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अधिष्ठाता कार्यालयात जमलेल्या तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील सुरक्षारक्षकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अखेर राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे आणि अमर देशमुख यांच्या मध्यस्थीने परिस्थिती निवळली. 

सोशल मिडियावर निषेध

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात ॲड. इस्माईल गवळी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “रुग्णालयातच नागरिकांवर मारहाण होणे अत्यंत धक्कादायक आहे”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. काहींनी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here