टीम AM : बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला जात असून, माळापुरी, घोसापुरी आणि पेंडगाव परिसरात सुमारे 400 हेक्टर क्षेत्रावर नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू असून, लवकरच सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे.
दरम्यान, अंबाजोगाई आणि केज मतदारसंघातील औद्योगिक विकासाचा प्रश्न मात्र अद्यापही रखडलेलाच असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात इतर भागात औद्योगिक प्रकल्पांसाठी वेगाने हालचाली सुरू असताना, अंबाजोगाई परिसरात मात्र ठोस पावले उचलली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
“अंबाजोगाईचं घोड कुठं आडलंय ?” असा सवाल आता जोर धरत असून, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना हा प्रश्न सोडविण्यात अपयश येत असल्याची टीका होत आहे. अनेक वर्षांपासून या भागात औद्योगिक विकासाच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक त्या हालचाली होत नसल्याने युवकांमध्ये नाराजी वाढली आहे.
विशेषतः केज आणि अंबाजोगाई परिसरातील हजारो तरुण शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या शहरांकडे स्थलांतर करत आहेत. स्थानिक पातळीवर उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित राहिल्या आहेत. परिणामी, कुटुंबांपासून दूर जाऊन काम करण्याची वेळ अनेक तरुणांवर येत आहे. त्यामुळे अंबाजोगाई आणि केज परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष अधिक तीव्र होत असून, “आमच्या भागासाठी स्वतंत्र ‘एमआयडीसी’ का नाही ?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
औद्योगिक विकासाशिवाय या भागाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे मत व्यक्त केले जात असून, शासनाने तातडीने लक्ष देऊन अंबाजोगाई – केज परिसरासाठी स्वतंत्र ‘एमआयडीसी’ जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता असून, लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. औद्योगिक विकासाचा समतोल साधत सर्व भागांना न्याय देणे हीच खरी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



