अंबाजोगाईत ‘महावितरण’ ची धडक वसुली मोहीम : थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडित…!

टीम AM : बीड जिल्ह्यात वाढलेल्या वीजबिल थकबाकीच्या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’ ने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. जिल्ह्यातील सुमारे सव्वादोन लाख ग्राहकांकडे तब्बल 155 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी असून चालू महिन्यातील वसुली केवळ 62 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे.

लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांविरुद्ध थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा मीटर काढून खंडित केला जात असून स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा पुरवठा स्वयंचलितपणे बंद केला जात आहे.

अंबाजोगाई आणि बीड विभागात थकबाकीचे मोठे आव्हान समोर आले असून वसुलीसाठी कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही घरोघरी जाऊन कारवाई करत आहेत. दरम्यान, अनधिकृतपणे वीज जोडल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा ‘महावितरण’ कडून देण्यात आला आहे.

कारवाईची वेळ टाळण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी चालू देयकासह आपली थकबाकी त्वरित भरून ‘महावितरण’ ला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.