टीम AM : 19 मार्च रोजी ‘अन्नत्याग’ आंदोलनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या आंदोलनाचे संयोजक सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, आच्चूतबापू गंगणे, वसंतराव मोरे आदींच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.
19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. शासनदरबारी नोंद झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्यानंतर देशभरात वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने हा दिवस ‘शेतकरी सहवेदना दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त दरवर्षी अन्नत्याग आंदोलन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
अंबाजोगाई येथे मागील दहा वर्षांपासून या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात असून यंदाही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे :
▪️ सकाळी 10 वाजता नगर परिषद परिसरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोर सामूहिक उपवास
▪️ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 10 विधवा महिलांचा सन्मान (साडी-चोळी देऊन)
▪️ माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना ‘शेतकरी सहवेदना पुरस्कार’ होणार प्रदान
▪️ ‘एबीपी’ माझाच्या कार्यकारी संपादिका सरीता कौशिक यांचे “शेतकरी आत्महत्या: कारणं आणि मिमांसा” या विषयावर व्याख्यान
कार्यक्रमाच्या शेवटी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसह सामूहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, केवळ शेतकरी आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. संवेदनशील विषय लक्षात घेता नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.



