सकाळी 6 वाजताच अजितदादांचा फोन : उषा चव्हाण यांनी सांगितली कठीण काळातील आठवण…!

टीम AM : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यातील एका भावूक प्रसंगाची आठवण सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत कशी मिळाली, याचा अनुभव सांगितला. पुण्यातील धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांनी ‘उषा पॅलेस’ नावाने एक छोटासा हॉल उभारला आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना कमी खर्चात कार्यक्रम करता यावा, हा या हॉल उभारण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश होता. भविष्यातही हा हॉल गरजूंना कमी दरातच उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी आपल्या सुनेलाही सांगून ठेवले आहे. मात्र, हा हॉल उभारताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा मिळत नव्हता. हॉलच्या उद्घाटनाच्या अवघ्या दोन दिवस आधी ही अडचण गंभीर बनली होती. या वेळी काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर सकाळी 6 वाजताच अजित पवार यांनी स्वतः उषा चव्हाण यांना फोन करून संध्याकाळी 4 वाजता भेटण्यासाठी बोलावले.

भेटीदरम्यान गर्दीतही उषा चव्हाण यांना पाहताच अजित पवार यांनी त्यांना तात्काळ बोलावून घेतले आणि जवळच बसलेल्या अधिकाऱ्यांना ‘उषा पॅलेस’ ला पाण्याची सोय करण्याचे निर्देश दिले. त्याच रात्री संबंधित अधिकाऱ्यांनी हॉलसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. ‘हे माझं कर्तव्य आहे,’ असे म्हणणाऱ्या अजित पवार यांच्या त्या मदतीची आठवण सांगताना उषा चव्हाण भावूक झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here