जिल्हा परिषद निवडणूक : अंबाजोगाईच्या आशा भिसे अवघ्या दोन मतांनी विजयी, सर्वत्र चर्चा…!

टीम AM : महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी तर अवघ्या काही मतांच्या फरकाने विजय – पराजय ठरल्याने निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकाल देखील तितकाच थरारक ठरला. येथे माजी आमदार त्र्यंबक (नाना) भिसे यांच्या कुटुंबातीलच दोन महिलांमध्ये थेट सामना रंगला होता. माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या दोन्ही बंधूंच्या पत्नी या एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या आशा भिसे यांनी त्यांच्या मोठ्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. त्यामुळे या विजयाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, विजयी ठरलेल्या आशा भिसे या अंबाजोगाईच्या रहिवासी असून त्यांचे माहेरकडील नाव आशा सरवदे असे आहे. जेष्ठ विधिज्ञ ॲड. शेषराव सरवदे यांच्या त्या कन्या आहेत. अवघ्या दोन मतांनी मिळालेल्या विजयामुळे कामखेडा गटाचा निकाल चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांच्यासाठी हा निकाल राजकीय धक्का मानला जात असून स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here