टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये गहू न देता सडलेली व निकृष्ट दर्जाची ‘हायब्रीड ज्वारी’ वितरीत केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बायोमेट्रिक त्रुटींमुळे ‘लाडकी बहीण’ व ‘श्रावण बाळ’ योजनेचे अनुदान अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नांबाबत आज अंबाजोगाई तहसील कार्यालयात प्रशासनाला धडक देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात रेशन दुकानांमध्ये गहूऐवजी देण्यात येणारी ज्वारी ही सडलेली असून तिचा वास येत असल्याने ती खाण्यायोग्य नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गहू पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, बायोमेट्रिक प्रणालीतील त्रुटीमुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान अडकल्याने महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच वृद्धांना ‘श्रावण बाळ’ योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. या योजनेतील अडथळे तात्काळ दूर करून लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, नगरसेवक ॲड. काकडे, नगरसेवक राजपाल जावळे, नगरसेवक मालू जोगदंड, ॲड. शहाजान पठाण, ॲड. इस्माईल गवळी, तानबा लांडगे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



