टीम AM : अंबाजोगाई शहरातील तथागत चौकाजवळ असलेल्या शारदा नगर भागातील महिलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 19 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील रहिवाशांनी, रस्ता आणि सांडपाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ मार्ग न काढल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शारदा नगर भागात नागरिक गेल्या दोन दशकांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, आजही या भागात धड रस्ता उपलब्ध नाही. कच्च्या रस्त्यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते, तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागतो. घराबाहेर पडणेही येथील महिला आणि लहान मुलांसाठी जिकिरीचे झाले आहे.
रस्त्यासोबतच सांडपाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. परिसरातील हॉटेलचे घाण पाणी थेट कॉलनीत येऊन साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जोगाईवाडी ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
हे क्षेत्र भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांच्या मतदारसंघात येते आणि जोगाईवाडी ग्रामपंचायतही त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे. महिलांनी सांगितले की, ‘आम्ही वारंवार आमदार महोदयांना आणि सरपंचांना भेटून समस्या मांडल्या, पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासने मिळाली. निवडणूक आली की लोकप्रतिनिधी मते मागायला येतात, पण निवडून आल्यावर महिलांच्या वेदना कोणाला दिसत नाहीत.’ एका महिला लोकप्रतिनिधीकडून महिलांच्याच प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. ‘आम्ही अनेक वर्षांपासून हा त्रास भोगतोय. आता आमचा संयम सुटला आहे. जर लवकरात लवकर तथागत चौकाजवळील रस्त्याचा आणि सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आम्हाला उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नाही,’ असा इशारा शारदा नगरमधील महिलांनी दिला आहे.



